Saturday 28 January 2017

अष्टपैलू कलाकार...अशोक सराफ

             मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारे मराठमोळे अभिनेते म्हणजेच आपले सर्वांचे लाडके मामा अशोक सराफ.. अशोक मामा मूळ बेळगावचे त्यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला. लहानपणापासूनच अभिनय आणि रंगभूमीची आवड असणाऱ्या मामांनी सन १९६० आंतर बँक एकांकिका स्पर्धेमध्ये नाटकात सहभाग घेऊन रसिकप्रेक्षकांची मन जिंकली आणि त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. त्यानंतरची ५ दशकं त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवली. त्यानंतर त्यांनी शिरवाळकरांच्या ययाती आणि देवयानी या नाटकातून विदुषकाची भूमिका करून व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. गजानन  जहांगीरदार यांच्या दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिका साकारली. १९७१ पासूनचा हा प्रवास खरंच उल्लेखनीय आहे. नाटक,चित्रपट,हिंदी चित्रपट,किव्हा दूरचित्रवाणीच्या मालिका असो अशोक मामांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम केलं आणि रसिकप्रेक्षकांची मनं काबीज केली. हा त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरु असताना त्यांना साथ लाभली ती दिग्गज कलाकार दादा कोंडके यांची आणि याचं सहवासातून पांडू हवालदार हा सवोत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आणि याच चित्रपटाने महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार अशोक सराफ यांना मिळवून दिला. १९७७ ला आलेला राम राम गंगाराम या चित्रपटाने फिल्मफेअर चा पुरस्कार अशोक मामांना बहाल केला. अबोध,फुलवारी,येस्स बॉस,जागृती असे हिंदी चित्रपट करून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत मराठीचा झेंडा रोवला.

विनोदी भूमिकांमध्ये मामा आपल्या सर्वानाच माहित आहे परंतु गंभीर तसेच खलनायक असलेल्या भूमिकाहि ते चोख पार पडतात. माझी माणसं आणि आत्मविश्वास या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहाते. वजीर चित्रपटात राजकारणी व्यक्तिरेखा तसेच चौकटराजा मध्ये अतिशय भाबडी व्यक्तिरेखा साकारून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. ८० च्या दशकात त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांची साथ लाभली आणि या जोडीने मराठी चित्रपटसृष्टीला सोनेरी दिवस आणले. हि जोडी ज्या चित्रपटात असेल तो चित्रपट हिट होईलच यात काही शंकाच नव्हती. अशी हि बनवा बनवी,धुमधडाका,चंगू मंगू,एका पेक्षा एक,असे चित्रपट देऊन धम्माल उडवली.अशी हि बनवा बनवी ने अशोक सराफ यांना वेगळीच ओळख दिली. हिंदी मध्ये  करण अर्जुन,कोयला,जोडी नं १ यासारखे अनेक उल्लेखनीय चित्रपट केले. त्यांची नाट्यसृष्टीही बरीच गाजवली. नंतर निवेदिता सराफ यांच्यासारखी एक सच्ची जोडीदार त्यांना लाभली, निवेदिता सराफ यांनी अनेक अडचणीच्या काळात अशोक सराफ याना मोलाची साथ दिली. निवेदिता सराफ यांच्या सोबत त्यांनी निर्मिती संस्था चालू केली आणि या संस्थेच्या अंतर्गत त्यांनी अजून एका चित्रपटाची निर्मिती केली तो म्हणजे एक डाव धोबीपछाड़. हम पाच या मालिकेने ५ वर्ष रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवलं. रंजना सोबत अशोक सराफ यांनी बरेच गाजलेले चित्रपट केले. गोंधळात गोंधळ आणि गुपचूप गुपचूप या चित्रपटांनी अशोक मामांना फिल्मफेअर मिळवून दिला. शब्दांचे खेळ करून संवाद फेक करणे हि मामांची खासियत आहे. २१ शतकातही त्यांनी अनेक गाजलेले चित्रपट केले आम्ही सातपुते,आयडियाची कल्पना,एकुलती एक,आंधळी कोशिंबीर, असे अनेक चित्रपट केले. अशोक मामांच्या या प्रवासात त्यांनी एकूण २२६ चित्रपट,६ नाटकं आणि १० मालिका करून रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली.अस्खलित विनोद करून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अशोक सराफ यांना majja.ooo तर्फे हार्दिक शुभेच्छा.





majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment