Friday 3 March 2017

पत्रकार ते दिग्दर्शक....एक प्रवास

पत्रकार ते दिग्दर्शक....
 

                     दिग्दर्शन क्षेत्रात जिद्दीने आणि स्वकष्टाने आपले नाव दिग्गज मंडळींच्या रांगेत ज्यांनी उभे केले ते नाव म्हणजे संतोष कोल्हे.कोणीही गॉडफादर नसताना चित्रपट सृष्टीत आपली स्वतःची ओळख निर्माण करणं प्रत्येकालाच कठीण जातं परंतु संतोष कोल्हे याला अपवाद ठरतात. संतोष कोल्हे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील पिंपरुड या छोट्या गावी झाला. शालेय शिक्षण देखील तिथेच झाले. त्यानंतर एस.पी कॉलेज मधून बीएसी ची पदवी घेतली. एस.पी कॉलेज मध्ये असताना एकांकिका करणं,कॉलेजमधील ग्रुप्स सोबत पथनाट्य करणं,सांस्कृतिक कार्यक्रम राबवणं यांसारखे अनेक उपक्रमात त्यांनी भाग घेतला. त्यानंतर रानडे इन्स्टिटयूड मधून त्यांनी पत्रकारिता करायचं ठरवलं. हे सगळं सुरु असताना त्यांचं थिएटरही सुरु होतं.पत्रकारिता पूर्ण झाल्यावर पुण्यातच प्रभात या वर्तमानपत्रात नोकरी केली. नंतर लोकसत्ता मध्येही काही काळ नोकरी केली. महानगर या वर्तमानपत्रासाठी काही काळ फ्री लान्सिंग केलं. पत्रकारितेमध्ये त्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली. त्यानंतर काही मित्रांना घेऊन त्यांनी युनिक फीचर्स एजन्सीची सुरुवात केली. त्यांनी १०-१२ वर्ष या एजन्सी साठी काम केलं. तसेच सामाजिक समस्या,स्त्रिया अश्या विविध विषयांवर डॉक्युमेंट्री बनवण्याचं काम देखील त्यांचं सुरु होतं. ऑडिओ आणि विडिओ या माध्यमांशी त्यांची ओळख झाली. याबाबतीत त्यांना रस वाटू लागला आणि ते स्वतः एडिटिंग शिकले. आणि त्यांना व्हिडीओ फिल्म मेकिंगची आवड निर्माण झाली. पत्रकारितेपेक्षा या माध्यमात आपण जास्त काम करू शकतो आणि मुख्य म्हणजे इथे काम करताना कामाचं समाधान मिळतं याची जाणीव त्यांना झाली.

                 प्रत्येक माध्यमांचा नीट अभ्यास करून मगच कोणताही काम हाती घेण्याची त्यांची हि सवय त्यांना इथे उपयोगी पडली. त्यांनी प्रत्येक माध्यमांचा नीट अभ्यास केला आणि झी मराठीवरील भटकंती हि त्यांची पहिली मालिका केली आणि त्यांना प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला. मराठीतला तो पहिला ट्रॅव्हल शो संतोष कोल्हे यांनी दिला. त्यांचा पहिलाच प्रोजेक्ट आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे त्यांचा हुरूप वाढला. त्यानंतर त्यांनी वर्तमान हि प्रिंट मीडिया ची पार्श्व्भूमी असणारी काल्पनिक मालिका तेव्हाच्या ईटीव्ही मराठी साठी केली आणि ती हि प्रचंड गाजली. त्यानंतर या क्षेत्रात त्यांचा आत्मविश्वास वाढला.त्यानंतर त्यांनी सांजसावल्या हि मालिका केली या मालिकेमध्ये सुलभा देशपांडे,सुहास जोशी,आणि रमेश देव अशी दिग्गज मंडळी होती. आणि तीही मालिका गाजली. या दीड वर्षात त्यांनी ३ मालिका केल्या. आता दिग्दर्शक म्हणून त्यांचा प्रवास सुरु झाला होता.
                त्यांच्या मेहनतीने आणि जिद्दीने त्यांनी मराठी सोबतच हिंदी मध्येही मराठीचा झेंडा रोवला. आशिष पाटील आणि संतोष कोल्हे यांनी मिळून एक उर्दू मालिका केली. 'किसी राह में,किसी मोड पर' असं त्या मालिकेचं नाव होतं. हिंदी मध्ये पहिला ब्रेक भेटला तो 'नाम गुम जायेगा' या हिंदी मालिकेसाठी. आणि त्यांचा हिंदी मधला प्रवास देखील सुरु झाला. नंतर शगुन या हिंदी मालिकेसाठी स्वतंत्रपणे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. ह्या हिंदी मालिकांचं त्यांचं काम बघून त्यांना बालाजी टेलिफिल्मस मधून बोलावणं आलं. आणि आणखी एक संधी त्यांच्या वाटेला आली. कहाणी घर घर कि या गाजलेल्या मालिकेसाठी चार दिवस दिग्दर्शन करण्याची संधी त्यांना भेटली. त्यांची काम करण्याची पद्धत एकता कपूर आणि त्या प्रोडक्शन हाऊसलाही आवडली. आणि त्याच चार दिवसातल्या त्यांच्या कामाने त्यांची क्योकी सास भी कभी बहू थी या मालिकेसाठी त्यांची निवड झाली. पुढे बराच काळ त्यांनी त्या मालिकेचं दिग्दर्शन केलं. त्यानंतर याच प्रोडक्शन हाऊस ची कुसुम हि मालिका त्यांनी केली. थिएटरची पार्श्व्भूमी असल्यामुळे त्यांना कलाकारांकडून चोख काम काढून घ्यायला जमायचं. मालिकांचं दमछाक करणारं शेड्युल सांभाळून आता कंटाळा आला म्हणून ते चित्रपटाकडे वळले. मेड इन चायना हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. या चित्रपटाला राज्य पुरस्कार अन स्टार स्क्रीन अवॉर्ड असे पुरस्कार मिळाले. त्यानंतर ते परत मालिकांकडे वळले बंदिनी,बैरी पिया या मालिकांसाठी दिग्दर्शनासोबत कथा पटकथा,कलाकारांची निवड अशा सगळ्या प्रक्रियेत ते सहभागी झाले. नंतर यु टीव्ही कडून रक्त संबध आणि सौभाग्यवती भव या मालिकाच्याही संपूर्ण निर्मिती प्रक्रियेत त्यांचा सहभाग होता.
                 सध्या ते मालक हा चित्रपट करत आहेत. दरम्यान टीव्ही इंडस्ट्री मध्ये काहीतरी करत राहावं या उद्देशाने लॉजिकल थिंकर्स हे प्रोडक्शन हाऊस सुरु केलं. आणि याच बॅनर खाली सुनबाई जोरात,ढोलकीच्या तालावर,झुंज मराठमोळी,जल्लोष सुवर्णयुगाचा,जत्रा अशा कार्यक्रमांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं.
               अफाट मेहनत आणि जिद्द. आपल्या कामातून बोलायचं हा त्यांचा फंडा त्यांना ह्या उंचीवर घेऊन आला. कोणताही सपोर्ट नसताना त्यांनी हिंदी आणि मराठी टीव्ही मालिकांच्या जगात आपलं नाणं खणखणीतपणे वाजवून दाखवलं. अशाच प्रतिभावंत आणि आपल्या कामात ग्रेट असणाऱ्याला ह्या हरहुन्नरी कलाकाराला त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी majja.ooo तर्फे खूप शुभेच्छा.




majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment