Saturday 11 February 2017

प्रतिभावंत अभिनेत्री....उषा नाडकर्णी

                 उषा नाडकर्णी म्हणजेच बिंदास्त,मोकळ्या मनाची,आणि स्पष्ट व्यक्ती अभिनेत्री. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतून कलाकारांची कधी आई तर कधी सासू बनून भूमिका बजावल्या. १३ सप्टेंबर १९४६ रोजी उषा ताईंचा जन्म कर्नाटक येथे झाला परंतु आई वडील मूळचे मुंबईचे असल्यामुळे त्याचं संपूर्ण शिक्षण मुंबई मध्येच झालं. त्यांची आई शिक्षिका असल्यामुळे उषा ताईंची भाषा स्वच्छ होती. ४० वर्ष चित्रपटसृष्टीत काम करून त्यांनी रसिकप्रेक्षकांची मन जिंकली. त्यांना अभिनयाची आवड लहानपणापासून होती. गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन त्यांना अभिनय करण्याची प्रेरणा मिळाली. अभिनयक्षेत्रात आपण काहीतरी योगदान द्यावं असं त्यांना वाटू लागलं. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तेव्हा त्या अभिनयापासून थोड्या दुरावल्या कारण त्यांना मुलांची भयंकर भीती वाटत होती पण उषा ताईंच्या बोलण्याचा परिणाम असा झाला कि नंतर मूळ त्यांना घाबरायची. हौशी रंगमंचापासून स्पर्धा मध्ये नंतर व्यावसायिक रंगभूमीवर त्यांच आगमन झालं. आणि त्यांचं पाहिलंच नाटक राज्य नाटक स्पर्धेत तुफान गाजलं. त्यानंतर त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. बिरला क्रीडामध्ये अनेक नाटकांच्या तालमी रंगायच्या त्यावेळेस अनेक कलावंतांकडून त्यांनी अभिनयाचे धडे शिकायला मिळाले.
                त्यांनी जेव्हा आपलं करियर याचं क्षेत्रात करायचे ठरवले तेव्हा त्यांच्या आईने ह्या गोष्टीला विरोध केला. हे क्षेत्र मुलींसाठी बरोबर नाही असा त्यांचा समज होता परंतु घाबरून न जाता उषा ताईंनी एका नाटकामुळे त्यांच्या आई वडिलांचा विश्वास संपादित केला. त्या नाटकाचे वर्षभरात बरेच प्रयोग झाले आणि त्या एका नाटकाच्या भूमिकेने त्यांना वर्षभरात ७ पारितोषिक मिळाली. नंतर त्यांची खऱ्या अर्थाने अभिनयाची वाटचाल सुरु झाली अनेक बड्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. रमेश पवार लिखित गुरु या नाटकातील भूमिका बरीच गाजली. १९७९ साली डॉ जब्बार पटेल दिग्दर्शित सिहांसन हा पहिला चित्रपट त्यांच्या वाटेला आला  यात शांताबाईंची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी साकारली. आणि त्यांच्या सोबत होते अभिनेते निळू फुले. पूर्ण सत्य,प्रतिभा,धुमाकूळ हे गाजलेले चित्रपट त्यांच्या वाटेल आले. पुरुष या नाटकातून त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळीच कलाटणी आली. नाना पाटेकरांसोबत छोटी पण महत्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली. याव्यतिरिक्त महासागर,आमच्या या घरात यांसारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी अभिनय केला.

                  १९९० च्या दशकातल्या माहेरची साडी हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातला एक म्हह्त्वपूर्ण चित्रपट ठरला. या सिनेमामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली.त्यानंतर त्यांना  आई आणि सासू ह्या भूमिकेसाठी बऱ्याच भूमिका मिळाल्या. त्यांच्या पहिला हिंदी चित्रपट होता गुंडाराज त्यानंतर अनेक हिंदी चित्रपट त्यांच्या वाटेल चालून आले. महेश मांजरेकर दिग्दर्शित वास्तव या चित्रपटातील भूमिका उषा ताईंनी साकारली. कोणतीही भूमिका करताना जीव ओतून काम करायचं हे त्यांचं नेहमीच तत्व. त्यामुळे त्यांनी साकारलेल्या भूमिका नेहमीच लक्षात राहतात. नंतर त्यांनी छोट्या पडद्यावर देखील आगमन केलं. दूरदर्शनच्या ज्ञानदीप हि त्यांची पहिली मालिका नंतर आडोस पडोस ह्या हिंदी मालिकेमुळे त्यांनी हिंदीच्या छोट्या पडद्यावरही छाप पाडली. त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा चित्रपट म्हणजे 'नशीबवान'... त्या त्यांची मोलकरणीची भूमीका सर्वाना इतकी आवडली कि त्या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र राज्यशासनाचा विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ये तेरा घर ये मेरा घर,कृष्ण कॉटेज,वन टू थ्री यांसारख्या हिंदी चित्रपटांमधून त्यांनी छोट्यामोट्या भूमिका साकारल्या.    
                          अगडबम,देऊळ,येलो,वक्रतुंड,महाकाय,पक पक पकाक या चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही लक्षात राहतात. उतारवयात हि  त्यांना अनेक सिनेमांमध्ये संधी मिळाली. भूतनाथ रिटर्न,आर राजकुमार,ग्रेट ग्रँड मस्ती,रुस्तम या चित्रपटातही उषाताई झळकल्या. पवित्र रिश्ता हीं त्यांची मालिका बरीच चालली ह्या मालिकेमुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांनी अनेक मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका केल्या. खुलता कळी खुलेना हि त्यांची मालिका सध्या बरीच गाजतेय. ४० वर्ष आपल्या भूमिका जिवंत ठेवणाऱ्या या व्यक्तिमत्वाला त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी majja.ooo तर्फे शुभेच्छा.  






majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment