Friday 3 February 2017

बघतोस काय मुजरा कर...

        महाराष्ट्राचं वैभव म्हणून ज्यांचा सर्वप्रथम उल्लेख होतो ते म्हणजे शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले. महाराष्ट्रातील किल्ले जपण्यासाठी बरेच जण भाषणं ठोकतात आपल्या आपल्या परीने मिरवणुका काढतात परंतु होत मात्र काहीच नाही. ह्या किल्ल्यावर आजही दारू पिऊन नाचणे,कचरा करणे आणि गडाच्या भितींवर लिहिणाऱ्यांची संख्या कमी नाही. हाच नाजूक विषय अगदी सोप्प्या शब्दात आणि योग्य पद्धतीने मांडून दाखवला आहे बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाने.
          चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं या चित्रपटाचं कथानक आहे. प्रथमच हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.जितेंद्र जोशी,अक्षय टंकसाळे आणि अनिकेत विश्वासराव यांनी आपल्या भूमिका खूप सुरेख उभ्या केल्या आहेत. अनिकेत विश्वासराव याने आवाज बदलून त्याच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. नेहा जोशी,रसिका सुनील आणि पर्ण पेठे यांची भूमिका हि चित्रपटानंतर लक्षात राहते. त्यासोबतच आनंद जोग आणि विक्रम गोखले यांची भूमिका देखील लक्षात राहण्यासारखी आहे. श्रेयस तळपदे आणि सोनाली कुलकर्णी यांची एन्ट्री देखील चित्रपटाला एक वेगळं वळण देते.सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या ह्या चित्रपटात बऱ्यापैकी विनोद निर्मिती होताना देखील दिसते.

         चित्रपटाची गाणी तितकीशी मनात उतरत नाही. काही गाण्याची गरज नसताना देखील ती चित्रपटात दाखवली गेली आहे. 'घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास तुझ्या गडांची ही व्यथा आता राजा, कळू दे साऱ्या जगास ' हे शब्द अगदी अंगावर काटा आणून सोडतात. हे गड आणि किल्ले यांचे खूप सुंदर चित्रीकरण ह्या चित्रपटात केले आहे. सामाजिक माणसांना भेडसावणारे प्रश्न त्यांच्याकडून नकळत होणाऱ्या चुका ह्या सर्वांचं उत्तर म्हणजे बघतोस काय मुजरा कर हा चित्रपट. तुम्हाला वेळ असेल तेव्हा हा चित्रपट एकदा जरूर पहा आणि स्वतःच्या फायद्यासाठी शिवाजी महाराजांचे नाव कोणाला वापरू देऊ नका. बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाला majja.ooo कढून ३ स्टार्स.



majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment